माया बाप

उभ आयुष्य खपवल
नाही स्वतासाठी जगला
चंदनाची ही उपमा पडे
तोडकि माया बापाला

नव्हती कधीच त्याला
भौतिक सुखाची नवलाई
अभिमानान सांगायचा
लेकर मायी कमाई

साऱ्या जीवनाचा सार
कमी शब्दात सांगायचा
जणु आयुष्य जगायची
संग शिदोरी द्यायचा

ना झुकला कोनापुढे
ना खुशमस्करी मानी
असा जगला माया बाप
सारे म्हणे स्वाभिमानी

ना केली आयुष्यभर
त्यान कामाची कसर
काम येईल जे हाती
पाही त्यामधे ईश्वर

आला निरोप द्यायले
अश्रु त्याचे ओघळले
लेक चालला माया दूर
ना त्याला सोसवले

लेकरांना कमी नको
ईच्छा स्वताच्या मारल्या
माया बापान वेदना
त्याच्या जीवावर काढल्या

चार लोकांत हसुन सांगे
आता झाली मायी कमाई
सोडुन गेला आयुष्यभरासाठी
माया बाप त्याची पुण्याई

खरा चित्रकार

इवल्याशा जीवा
भरीयले रंग
पाहुनिया दंग
झालो देवा

तुच माय बापा
खरा चित्रकार
ठरवी किनार
भाग्याचीया

तुझीच दयाळा
लेकरे अजान
सोडवी अज्ञान
जीवाचीया

विद्या हेचि धन

विद्येची भक्ति, विद्येची प्राप्ती
विद्याच संपत्ति, जिवनाची

विद्येचा अभाव, जीवाचा न ठाव
घेई जीव धाव, विषयांशी

विद्येची जाण, अज्ञानाचे निर्मुलन
ज्योतीचे आगमन, ज्ञानाच्या

विद्येचे अर्जन, जीवाचे भुषण
विद्येचा मान, सर्वत्रयी

विठु माऊली

चंद्रभागे काठी
देवा तुझे ठिकाण
तृप्त झाले मन
तुझीये ठाई

लोचने शोधती
तुलाच माय बापा
तुच एक सखा
असे पांडुरंगा

मस्तक ठेवीतो
चरणी बा तुझ्या
तिमीर मिटो माझ्या
अंतरीचा