खरा चित्रकार

इवल्याशा जीवा
भरीयले रंग
पाहुनिया दंग
झालो देवा

तुच माय बापा
खरा चित्रकार
ठरवी किनार
भाग्याचीया

तुझीच दयाळा
लेकरे अजान
सोडवी अज्ञान
जीवाचीया

विद्या हेचि धन

विद्येची भक्ति, विद्येची प्राप्ती
विद्याच संपत्ति, जिवनाची

विद्येचा अभाव, जीवाचा न ठाव
घेई जीव धाव, विषयांशी

विद्येची जाण, अज्ञानाचे निर्मुलन
ज्योतीचे आगमन, ज्ञानाच्या

विद्येचे अर्जन, जीवाचे भुषण
विद्येचा मान, सर्वत्रयी

विठु माऊली

चंद्रभागे काठी
देवा तुझे ठिकाण
तृप्त झाले मन
तुझीये ठाई

लोचने शोधती
तुलाच माय बापा
तुच एक सखा
असे पांडुरंगा

मस्तक ठेवीतो
चरणी बा तुझ्या
तिमीर मिटो माझ्या
अंतरीचा